Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

ई-बॅंकिंग सेवा



सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे. मोबाईलवरून खात्यातील उलाढाल करायची साथही त्यास मिळाली आहे. या सेवा-सुविधा देण्यासाठी आणि त्यांची उच्च प्रतीची गुणवत्ता ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि गुंतवणूकही होत आहे. परंतु, या सेवा-सुविधांचा वापर कितपत होत आहे, याचा आढावा घेण्याचीही आवश्‍यकता आहे.
आपली नेहमीची विविध प्रकारची बिले भरण्यास सर्वच सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करून ही सुविधा आपल्या दाराशी उभी केली असताना आपण त्याचा वापर पूर्णपणे करतच नाही. एवढी मोठी गुंतवणूक करून उभारलेल्या अशा मूलभूत यंत्रणांचा वापर फक्त मर्यादित लोकच करीत आहेत, असे सध्या दिसते.

अशा परिस्थितीची मुख्यत्वे तीन स्पष्ट कारणे दिसून येतात. या सुविधा उपलब्ध आहेत आणि आपण त्याचा वापर करू शकतो ही माहितीच बहुतांशी लोकांमध्ये नसावी. दुसरे म्हणजे सर्व काही माहीत असून, या यंत्रणांवर विश्‍वास नसल्याने त्यांचा वापर टाळण्याचा "तथाकथित उत्तम मार्ग' पत्करणारा विचारी वर्ग. तिसरे, अशा सुविधा आहेत, पण त्याचा वापर कसा करावा, सुरवात कोठे करावी, हे माहीत नसल्याने, नाइलाजाने रांगेत उभे राहून बिले भरण्याचा सोपा उपाय निवडणारे नागरिक.

बिले भरण्यास, डेबिट/ क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, एटीएम हे सोयीचे मार्ग झालेले आहेत. आणि आता त्यात मोबाईलची पण भर पडली आहे. सार्वजनिक बॅंका, खासगी बॅंका आणि काही सहकारी बॅंका या सुविधा देत असून, यातील डेबिट/ क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग मधील बऱ्याच सेवा परिपक्व झालेल्या आहेत. या माध्यमांतून बीएसएनएल (लॅंडलाइन वा मोबाईल), महावितरणची वीज बिले, प्रॉपर्टी टॅक्‍स, ऍडव्हान्स टॅक्‍स आपण सहजपणे घरबसल्या भरू शकतो. इंटरनेट बॅंकिंगवर मिळणाऱ्या बऱ्याच सुविधा आता नुसते एटीएम वापरून घेता येत आहेत. उदा. इन्शुरन्सचा प्रिमियम भरणे, फिक्‍स्ड डिपॉझिट काढणे, टॅक्‍स भरणा आदी.

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, एटीएम वापरून लुबाडले गेल्याच्या तक्रारी, इतर फसवणुकीचे प्रकार वर्तमानपत्रातून वाचनात येतात. अशा बातम्यांमुळे आर्थिक व्यवहारासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान कमकुवत आहे, असे वाटणे साहजिक आहे. परंतु, हा सर्व दोष तंत्रज्ञानाच्या पदरी टाकणे योग्य होणार नाही.

इंटरनेट बॅंकिंग सेवा साधारण 1999 मध्ये सुरू होऊन ऑनलाइन अकाउंट बघण्यापासून, पासबुक नोंदी, बिल भरणा, चेकबुक मागविणे, फिक्‍स्ड डिपॉझिट उघडणे, फंड ट्रान्स्फर, दुकानातून ऑनलाइन खरेदी, स्टॉक एक्‍स्चेंजवर शेअरची खरेदी/विक्री, विमान, रेल्वे, एसटीचे आरक्षण अशा वाढतच गेल्या आहेत. सेवा वाढविण्याबरोबर बॅंकांनी सुरक्षित सेवा देण्याच्या व्यवस्थापन पद्धतीत काळजीपूर्वक बदल केले आहेत. एका पासवर्डने मिळणारी इंटरनेट बॅंकिंग सेवा ही फंड ट्रान्स्फर करायचा असल्यास अजून एक प्रोफाइल पासवर्ड विचारते. त्रयस्थाशी आर्थिक व्यवहार करायचा झाल्यास, बॅंकेकडून व्यवहार पूर्ण करण्याआधी, काही बॅंका तुमच्या नोंद केलेल्या मोबाईलवर अजून एक कोड पाठवून तो कोड वापरण्यास अनिवार्य करतात. काही बॅंका तुमच्याकडे असलेल्या एटीएम कार्डवर असलेल्या ग्रीडमधील दिलेली अक्षरे/आकडे दिलेल्या क्रमात टाकल्याशिवाय व्यवहार पूर्ण करत नाही. क्रेडिट कार्डवरील व्यवहार हा क्रेडिट कार्डवरील माहितीव्यतिरिक्त अजून एका पासवर्डशिवाय पूर्ण करता येत नाही. एटीएम कार्डचा पिन चार आकडी असून, मोबाईलवरून व्यवहारासाठी सहा आकडी मोबाईल पीन वापरायचा असतो. ग्राहकांच्या किंवा नेटबॅंकिंग सेवा वापरणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, व्यवहारापूर्वी चेक, डबल चेक, ट्रिपल चेक केले जातात. तुमच्या व्यवहाराला जितके जास्त चेक्‍स, तितकेच अभेद्य सुरक्षाकवच!

हे सर्व बघता, नेटबॅंकिंग/ मोबाईल बॅंकिंग सेवेत आपली 100 टक्के फसवणूकच होईल, असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. ऑनलाइन फसवणुकीचे बरेच प्रकार आहेत. त्यात फिशिंग, स्पायवेयर, स्किमिंग असे प्रकार चालूच राहणार. सेवा देणाऱ्यांवर सेवेत खंड पाडण्यासाठी प्रयत्न किंवा यंत्रणेत बेमालूमपणे शिरण्याचा प्रयत्न बंद होणार नाही. परंतु, या सर्वांवर मात करण्यास आपण स्वत: सक्षम होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नेटबॅंकिंग/मोबाईल बॅंकिंग सेवा वापरताना काळजी घेणे जरुरीचे आहे. पासवर्ड, पिन सांभाळून ठेवणे हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा.

ई-मेलवरून आलेल्या प्रलोभनांना बळी न पडण्याची काळजी घेतल्यास आपण आपला व्यवहार सुरक्षित ठेवू शकता. इन्फोटेकचे विषय शिकविताना, माझ्या एमबीए, इंजिनिअरिंग आणि चार्टड अकाउंटंटच्या विद्यार्थ्यांना मी सुचवीत आलेला प्रारंभिक प्रयोग आपणही करू शकता.

एक नवीन नेटबॅंकिंग अकाउंट उघडून त्या खात्यात बिले भरण्यासाठी जेवढी रक्कम लागते, तेवढीच ठेवून, नेटबॅंकिंग सेवेतून बिले भरण्याचा किंवा इतर सेवा वापरण्याचा आनंद घरबसल्या घेण्यास सुरवात करावी. मात्र, या सर्व सुविधा वापरण्याकरिता घरच्या घरी संगणक, टेलिफोन, इंटरनेट सेवा जोडणी, संगणक सुरक्षेसाठी अँटी व्हायरस, इंटरनेट/ मोबाईल बॅंकिंग सेवा घेण्याकरिता बॅंकेकडे अकाउंटची नोंदणी, एक ई-मेल अकाउंट आणि मुख्य म्हणजे संगणक व इंटरनेट वापरण्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्‍यक आहे.



माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन